संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

‘तेरणा’ सुरू करण्यासाठी ‘आप’ तर्फे आजी-माजी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उस्मानाबाद – ढोकीतील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे ३५ हजार सभासद व कर्मचारी अडचणीत आहेत. असे असताना टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रदीर्घ काळ न्यायालयीन वाद सुरू राहणार असल्याने कारखान्याचे “डी व्हल्यूएशन’ होऊन कारखाना कायमचा बंद राहिल.यामुळे हा वाद मिटवून घेण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री व आमदार अमित देशमुख व आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती आम आदमी पक्षाचे राज्य समिती सदस्य अॅड. अजित खोत यांनी दिली.
यासंदर्भात काल रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. खोत म्हणाले,वाद मिटवण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व माजी मंत्री अमित देशमुख यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा, या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आमदार देशमुख यांच्या बाभळगाव येथील गढीसमोर २२ सप्टेंबर रोजी तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माढा येथील घरासमोर २३ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल. शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी व त्यावर अवलंबित्व असलेल्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरू होणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. मात्र देशमुख व सावंत यांच्या न्यायालयीन लढ्यामुळे हा कारखाना सुरू होत नाही. आजपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील अनेक कारखाने कायमस्वरूपी बंद पडले आहेत.आंदोलनानंतर सर्वांची स्वाक्षरी मोहीम राबवून त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.तसेच यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, सचिव मुन्ना शेख,कोषाध्यक्ष विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष राजपाल देशमुख आदी उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami