नवी दिल्ली- तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात मदतीसाठी गेलेले एनडीआरएफ पथक मायदेशी परतले आहे.एनडीआरएफचे पथक जेव्हा तेथून निघाले तेव्हा अडाना विमानतळावरील लोकांनी टाळ्या वाजवून पथकाचे आभार मानले. यानंतर, भारतात पोहोचल्यावरही गाझियाबादमधील अधिकाऱ्यांनी एनडीआरएफ टीमच्या सदस्यांचे स्वागत केले.
तुर्कस्तानमध्ये ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत मदत केल्यानंतर एक पथक शुक्रवारी परतले आहे. भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये 10 दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर श्वान पथकातील सदस्य रॅम्बो आणि हनी यांच्यासह एनडीआरएफचे ४७ सदस्यीय पथक शनिवारी भारतात परतले आहेत. हे पथक गाझियाबाद एनडीआरएफ बटालियनमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांचे मेडिकल केले गेले.
दरम्यान तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा ४५ हजारांवर गेला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. लाखो लोक हाडे गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावर रहात आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी सुमारे २ लाख ६४ हजार इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत, यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.