अंकारा – तुर्की आणि सिरीया आज सोमवारी तीव्र भूकंपाने हादरले. ७.८ रिश्टर स्केलच्या या भीषण भूकंपामुळे सुमारे १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो इमारतींची पडझड झाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हजारो लोक जखमी झाले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. हा भूकंप इतका मोठा होता की त्याचे हादरे कैरोपर्यंत जाणवले.
स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी तुर्कीमध्ये भूकंपाचा हादरा जाणवला. सिरियाच्या सीमेपासून ९० किलोमीटरवर असणाऱ्या गाझियाटेप येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सिरियन युद्धातील हजारो रेफ्युजींची घरे या भागात आहेत. तुर्कीसह सीरियामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सीरियामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. लेबनॉन आणि सायप्रस या ठिकाणीही या भूकंपाचे परिणाम जाणवले.
दरम्यान, भारत तुर्कीच्या मदतीला धावून जाणार आहे. बेंगळुरूमधील इंडिया एनर्जी वीक २०२३ कार्यक्रमात भाषण करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपाचा उल्लेख केला. ‘तुर्कस्तानला झालेल्या विनाशकारी भूकंप आपण सर्व पाहत आहोत.अनेक लोकांचा मृत्यू तसेच नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तुर्कस्तानजवळील देशांमध्येही नुकसान झाल्याचा संशय आहे. भारतातील १४० कोटी लोकांच्या सहानुभूती भूकंपग्रस्त सर्व लोकांसोबत आहेत’ असे दिलासादायक पंतप्रधान मोदींनी केले.
या घटनेबाबत तुर्की अधिकाऱ्यांनी अद्याप जखमी किंवा मृतांची अधिकृत नोंद केलेली नाही. पण सोशल मीडियावर भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये प्रचंड नुकसान झाल्याचे दिसते. अनेक इमारती कोसळल्याने लोक त्याखाली दबल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.