अंकारा : तुर्कि आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाला ८ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढच होत असल्याचे पहायला मिळत आहे. या दोन देशांमध्ये आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगारे हटवल्यानंतर मृतदेह बाहेर काढले जातील. त्यावेळी मृतांची संख्या दुप्पट असू शकते.अशी भीती देखील यूएनला मदत पाठवणाऱ्या युनिटचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशातील रेस्क्यू पथक माघारी फिरले आहेत. रविवारी इस्रायलसह जर्मनी आणि ऑस्ट्रियानेही तुर्कियेतून बचावपथके मागे घेतले आहेत. यासह विशेष कारण म्हणजे, इस्रायलसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांना तुर्किच्या सीमेवर वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसक चकमकी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तेथे पोहोचलेल्या बचाव कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याने हि पथके माघारी फिरली असल्याची माहिती समोर आली आहे. जर्मन बचाव पथकानेही गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली.
मात्र तुर्किच्या अंताक्या शहरात मृतदेहांच्या ढिगाऱ्यात लोक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. या ढिगाऱ्याखालून काढलेले मृतदेह ओळखणे कठीण होत असल्याने ते बॉडी बॅगमध्ये भरले जात आहेत. या पिशव्या उघडून नातेवाईक आपल्या प्रियजनांची ओळख पटवत आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ.टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सीरियाला ११० टन वैद्यकीय पुरवठा देण्याची घोषणा केली आहे.
तुर्कीमध्ये आतापर्यंत २९ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहे. एकूण मृतांचा आकडा ३३,१५८ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे भूकंपग्रस्त शहरांमध्ये बांधकाम कंत्राटदारांविरुद्ध चौकशी केल्यानंतर ११३ तुर्की इमारत कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. तुर्कस्तानच्या ८ प्रांतातून लुटीच्या आरोपाखाली ९८ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ४३ लोक हाते प्रांतातील आहेत.