तामिळनाडू- देशभरात प्रवास करताना पंतप्रधान मोदी अनेकदा डोक्यावर विविध प्रांतांची ओळख असलेल्या टोप्या परिधान करताना दिसतात. पण आजवर त्यांनी कधी गांधी टोपी डोक्यावर परिधान केली नव्हती. आज पंतप्रधानांच्या डोक्यावर ती दिसली त्याचबरोबर त्यांनी खादीचा प्रचारही केली. निमित्त होतं मोदींची तामिळनाडूतील गांधीग्राम संस्थानच्या 36 व्या दीक्षांत सोहळ्यात लावलेली हजेरी.
यावेळी मोदी म्हणाले, खादी हा महात्मा गांधींच्या कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे, आजच्या घडीला खादी खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या आठ वर्षात खादीच्या विक्रीत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गांधीजींसाठी स्वच्छतेची खबरदारी घेणं हा महत्वाचा विषय होता. यालाच पाठिंबा देताना आमच्या सरकारनं ग्रामीण स्वच्छता अभियान चालवलं, 6 कोटींहून अधिक लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं. तसेच अडीच कोटींहून अधिक लोकांना वीज कनेक्शन दिलं. भारताचं भविष्य तरुणांच्या ’आम्ही करु शकतो’ अशा पिढीच्या हातात आहे. आज पदवी घेणार्या तरुणांना माझा हा संदेश आहे की, आपण नव्या भारताचे निर्माते आहात, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी इथल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं.