नागपूर – विदर्भातील अंधारी -व्याघ्र प्रकल्पात मागील डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे लंगडत लंगडत भटकंती करणारी आणि दोन पिल्ले असणारी वाघिण निदर्शनास पडली आहे,
या माहितीला व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पांगडी परिसरात पर्यटकांनाही शनिवारी हिरडीनाला नावाने ओळखली जाणारी ही वाघीण दिसली.
वन्यजीव फोटोग्राफर विश्वास उगले हे आपल्या अन्य तीन फोटोग्राफर मित्रांसह पांगडी बफर परिसरात सफारीसाठी गेले असता ही वाघीण जवळून पाहिल्याचा दावा त्यांनी केला आहे.तिच्या डाव्या पंजाचे हाड तुटलेले दिसले.चालतानाही तिला बराच त्रास होत होता. आपल्या भक्ष्याला ठार करून ती उभी असतानाच अचानक एक मोठा वाघ आला.मात्र,गंभीर जखमी असूनही आपल्या भक्ष्याचे रक्षण करण्यासाठी तिने वाघाशी बराच संघर्ष केला. ही वाघीण दोन पिल्ले वाढवत आहे, त्यांच्या पोषणासाठी ती पांगडी परिसरातील पाळीव जनावरांनाही मारू शकते. दुखापतीमुळे तिच्या चपळतेवर परिणाम झाला आहे,यामुळे मनुष्य-प्राणी संघर्ष होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या जखमी वाघिणीबद्दल दुजोरा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.