औरंगाबाद – शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर सरकारने दिवाळखोरी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे. तसेच सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जायला घाबरत आहेत, असा आरोपही थोरात यांनी केला आहे.
औरंगाबाद मध्ये भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली . त्यांनी सांगितले कि, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने हेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाची मागणी होत असताना, सरकार मात्र निर्णय घ्यायला तयार नाही. पिकांच्या नुकसानीचे अजून पंचनामे सुद्धा झालेले नाहीत. सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जायला घाबरत आहेत. शेतकऱ्यांना द्यायला जर सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी सरळ दिवाळखोरी जाहीर करावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले कि, राज्यात सरकार कसे आले,मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कशा झाल्या हे जनतेने पहिले आहे. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत .असेही त्यांनी सांगितले.