रियो डि जेनेरो – अखेर अर्जेंटीनाने कोपा अमेरिका 2021चा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने आर्क रायवल्स ब्राझीलचा 1-0ने परभाव केला. अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी 1993मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघाने पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. तसेच मेस्सीने जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. एंजल डि मारियाने 21व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल डागत संघाला विजय मिळवून दिला.
कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघांकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असे बोलले जात होते. अंदाजाप्रमाणे मैदानात दोन्ही संघांकडून कडवा प्रतिकार बघायला मिळाला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज पाहायला मिळाली. दोन्हीकडून तोडीस तोड प्रतिकार केला जात असल्याने कोणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आले नाही. मात्र २२व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.