नागपूर- ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांच्यावर नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असूनही त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत चालल्याने त्यांना लवकरच मुंबईला हलविले जाणार आहे.आता त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातल्या चातगाव येथील सर्च- शोधग्रामच्या प्रणेत्या डॉक्टर राणी बंग यांना तीन दिवसांपूर्वी वर्धा येथील एका जाहीर कार्यक्रमानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांना नागपुरात हलविण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे निदान करण्यात आले आहे.डाॅ.बंग यांच्यावर नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवले आहे.मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. डॉ.राणी बंग यांनी आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत.गडचिरोली जिल्ह्य़ात त्यांनी दारूबंदीसाठी अविरतपणे काम केले आहे.