ठाणे- ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या 21 वर्षे मुलीचा रिक्षा चालकाने विनयभंग करत फरपटत नेल्याचा प्रकार शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी घडल्यानंतर रविवार पर्यंत सदर मुलीला कोणत्याही प्रकारची शासकीय व वैद्यकीय मदत मिळालेली नसल्याची माहिती मिळताच शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी रविवारी पीडित मुलगी व कुटुंबियांची राहत्या घरी भेट घेऊन शिवसेनेकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. शुक्रवारी सकाळी सात वाजता सदर पीडित तरुणी कॉलेजला जाण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात आली असता रिक्षा चालकाने पीडितेकडे पाहत अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर पिडितेने धाडस दाखवत जाब विचारत त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने तिला जवळपास 500 मीटर पर्यंत फरपटत नेले. सदर प्रकरण सीसीटीव्हीत कैद झालेले असून पीडित तरुणीच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत देखील झालेली आहे. घटनेनंतर सदर तरुणीस कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत देखील करण्यात आलेली नाही. तसेच सदर तरुणी या प्रकारानंतर दहशतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याची माहिती मिळताच आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसह पीडित तरुणीची भेट घेत शिवसेना तिच्या पाठीशी असून तिला सर्वतोपरी मदत करत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ठाण्यातील महिलांच्या वाढत्या असुरक्षिततेबाबत ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी ठाण्याच्या माजी महापौर स्मिता इंदलकर, जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर, तसेच आकांक्षा राणे, मंजिरी ढमाले, सुषमा राणे व सुनंदा भापकर या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.