संभाजीनगर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी जाहीर केली आहे. १९ नोव्हेंबरच्या विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमात त्यांना ही पदवी बहाल केली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
महाराष्ट्राच्या राजकीयच नाही तर सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठ डी. लिट पदवी देऊन सन्मानित करते. त्यानुसार यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे. या दोघांचे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या पदवीदान समारंभात या दोघांना डी. लिट पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे. १९ नोव्हेंबरला विद्यापीठाचा पदवीदान कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व परम सुपर कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत भाषणात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले.