ठाणे : ठाण्यातून एका तरुणाचे थायलंडमध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे. काम देण्याच्या बहाण्याने हे अपहरण करण्यात आले आहे.बनावट क्रिप्टोकरन्सी बनवणाऱ्या टोळीकडून या तरुणाच्या सुटकेसाठी ३ हजार डॉलरची खंडणी मागण्यात येत आहे. थायलंड दूतावासाशी संपर्क करुन माझ्या मुलाची सुटका करा अशी मागणी अपहरण झालेल्या तरुणाच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय आशिष दुबे या तरुणाला 12 सप्टेंबर रोजी थायलंडला नोकरीसाठी गेला होता. तेथे त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले. यानंतर त्यांना आश्वासनानुसार डिजिटल मार्केटिंगचे कामही न देता कॉल सेंटरमध्ये काम देण्यात आले.त्याला महिलांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवण्यास सांगण्यात आले. तक्रारीत म्हटले आहे की कंपनीने त्याला लोकांना क्रिप्टोकरन्सी विकत घेण्यास प्रवृत्त करण्यास सांगितले आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाइल वापरून त्यांची फसवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करून कंपनीने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास भाग पाडले. क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी आणि कंपनीने ठरवून दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लोकांशी संपर्क साधण्यास सांगितले जात आहे.त्याला त्याच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधू दिला जात नाही. मात्र या तरुणाने कसेतरी कुटुंबाशी संपर्क साधण्यात यश मिळवले. सुटकेसाठी ही बनावट कंपनी अमेरिकन डॉलर 3,000 मागत असल्याचे सांगितले. मोठ्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वागळे इस्टेट विभागाच्या श्रीनगर पोलिस ठाण्यात थायलंडच्या नागरिकाविरुद्ध फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय (CMO) यांच्याकडेही याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान,पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.