ठाणे – एका २५ वर्षीय तरुणीचा गेल्या महिनाभरापासून पाठलाग करणाऱ्या ५९ वर्षीय राजेश भावसार या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात घडली होती. पोलिसांनी चौकशी करण्यापूर्वीच धसक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत केला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
कल्याण येथे राहणारी एक तरुणी पनवेल येथे नोकरीला आहे.त्यामुळे ती दररोज कल्याण ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल असा प्रवास करते. कल्याणमध्येच राहणारा भावसार हा बेलापूर येथे एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्यामुळे तोही सकाळी या मुलीच्या मागावर असायचा.ही आपबिती पीडित तरुणीने आपल्या आईला सांगितली.
तेव्हा ६ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ती ठाण्यातून पनवेलकडे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात होती.त्यावेळी तिची आई देखील सोबत होती. त्यावेळी तो ठाणे रेल्वे स्थानकातील पायऱ्या उतरतांना या मुलीने पाहिले. तेव्हा तिने आईच्या निदर्शनास आणले. त्यांना पाहून तो तिथून पळत असतांना त्यांनी त्याला ठाणे रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेल्या पुलावर गाठले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या आरपीएफ पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत त्याला नेऊन त्याची चौकशी केली.तेव्हा हा विनयभंगाचा प्रकार असून तो रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित असल्याचे त्यांनी या मायलेकिंना सांगितले.आरपीएफच्या जवानांनी त्याला ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आणले.तिथे एकीकडे त्या तरुणीची तक्रार घेतली जात होती.त्यामुळे त्याची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच तो काही वेळातच खाली कोसळला. त्याला तातडीने रेल्वे पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.
दरम्यान,पोलीस ठाण्यातील मृत्यूमुळे सीआयडी करणार तपासपोलीस ठाण्यात भावसार याला आणले गेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.असे असले तरी नियमाप्रमाणे पोलीस ठाण्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीआयडी बेलापूर येथील पथकाकडून केला जाणार आहे. शुक्रवारी हे प्रकरण ठाणे रेल्वे पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. त्याचवेळी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीच्या तपासणीबरोबर पोलीस अंमलदारांचीही चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.