नवी दिल्ली: ट्विटरची मालकी घेतल्यापासून सातत्याने चर्चेत असलेले इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत झालेल्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.त्यामुळे आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर असणारे फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.
इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. टेस्लाच्या शेअरची किंमत शेवटच्या ट्रेडिंग दिवशी प्रति शेअर २०७.६३ डॉलरच्या पातळीवर पोहोचली. मस्कच्या कंपनीच्या शेअरमध्ये ५.४६ टक्के किंवा प्रति शेअर १०.७५ डॉलर वाढ झाली.
श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सातत्याने टॉप-१० मध्ये स्थान कायम ठेवले आहे. ८१.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, रिलायन्सचे चेअरमन जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ६४६ मिलियन डॉलरची घट झाली आहे. लॅरी पेज ८४.७ अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे, तर कार्लोस स्लिम हेलू ८३.२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हिंडनबर्गच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या ३७.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहेत.