उस्मानाबाद – एसटी महामंडळातील महिला कंडक्टर मंगल गिरी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई शेवटी एसटी महामंडळाला मागे घ्यावी लागली. यावरून राजकीय नेत्यांसह अनेकांनी आवाज उठवल्यानंतर आणि ही कारवाई चुकीची असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर कळंब आगाराच्या व्यवस्थापकांनी गिरी आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली असल्याचे जाहीर केले.
टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांनी ड्युटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले होते. त्यानंतर महामंडळाची बदनामी केल्याचा आणि चालकाच्या सीटवर बसल्याचा ठपका ठेऊन १ आक्टोंबरला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही राजकीय नेत्यांनीही महामंडळाच्या या कारवाईवर आक्षेप घेतला. सोशल मीडियावरही महामंडळाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात होता. शेवटी या सर्व प्रकाराची चौकशी करून एसटी महामंडळाने या दोघांवरील निलंबन मागे घेतले.