नवी दिल्ली – देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने काल बुधवारी सप्टेंबर अखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ९४५ कोटी रुपयांच्या तोटय़ाची नोंद केली आहे.देशांतर्गत आघाडीवर वाणिज्य वाहनांची वाढलेली मागणी आणि जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीत सुधारणा झाल्याने गतवर्षांतील या तिमाहीच्या तुलनेत तोटा पाच पटींनी कमी झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीत ४,४४२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता.
कंपनीला दुसऱ्या तिमाहीत ८९८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत तो ४,४१६ कोटी रुपये होता.यादरम्यान कंपनीचा महसूल १५,१४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे,जो गेल्या वर्षी या तिमाहीत ११,१९७ कोटी रुपये होता.टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जग्वार लँड रोव्हरने दुसऱ्या तिमाहीत ५.३ अब्ज पाऊंडची कमाई केली,जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील कमाईपेक्षा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. चीनवगळता जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जेएलआरची जागतिक स्तरावर एकूण ७५,३०७ वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षांपेक्षा १७.६ टक्क्यांनी अधिक आहे.