नवी दिल्ली – भारतीय लष्कराची जमीन बळकावल्याप्रकरणी ईडीने आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये १२ ठिकाणी छापे घातले. कोलकत्ता येथील व्यावसायिक अमित अग्रवाल यांचा त्यात समावेश आहे. काही राजकीय नेत्यांच्या घर आणि कार्यालयावरही ईडीने धाडी घातल्या आहेत.
अमित अग्रवाल यांच्या चौकशीत लष्कराच्या जमिनींची बनावट कागदपत्रे बनवून गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे बरियाटू आणि रांची येथील लष्कराची साधारण ५० एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात महापालिका आयुक्तांसह बडे सरकारी अधिकारी ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी ईडीने झारखंडमध्ये ८ आणि पश्चिम बंगालमध्ये ४ अशा एकंदर १२ ठिकाणी आज छापे घालून झडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार व कागदपत्रे सापडली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.