रांची – झारखंडमधील धनबाद येथील आशीर्वाद टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी भीषण आग लागली. ही आग मोठी असल्याने येथील रहिवाश्यांचे मोठे नुकसान झाले. यात १० महिला, तीन मुले व अन्य एकासह १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना तेथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
धनबाद येथील जोराफाटक मार्गावर असलेल्या आशीर्वाद अपार्टमेंट मधील एका घरात भीषण आग लागली. मंगळवारी या १० मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लग्न समारंभ सुरु होता. त्याच वेळी तिसऱ्या मजल्यावरील घरात दिव्यामुळे आग लागली. रहिवाश्यांना कळेपर्यंत आग पूर्ण मजल्यावर पसरली व ती चौथ्या मजल्यावरही पोहोचली. आग प्रचंड मोठी असल्याने त्यात लग्न घरातील काही लोक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला. या घटनेची दाद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर, जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत म्हणून देण्याचे जाहीर केले. याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बचावकार्य सुरू केले.