मुंबई- मालाड पूर्व येथे बेकायदेशिररित्या १,१६५ झाडांची कत्तल केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी नुकतेच दोन गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात ५६० व दुसऱ्या प्रकरणात ६०५ झाडांची कत्तल केल्याची तक्रार करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या तक्रारीनुसार, मालाड (पूर्व) येथील आयटी पार्कजवळील भूखंडावरील ५६० झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. जून २०२२ मध्ये ही वृक्षतोड झाली होती. मुंबई महानगरपालिकेने याबाबत २९ जून रोजी सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात तेथील ५६० झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले.