मुंबई – अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26` या चित्रपटातील बोगस छापेमारीसारखी घटना मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारात घडली. चार जणांनी ईडी अधिकारी असल्याचे भासवून झवेरी बाजारातील सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयात छापेमारी करुन मोठा हात मारला. या चोरट्यांनी अवद्या 10 मिनिटांत कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोने लंपास केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची जोरदार छापेमारी सुरु आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह अनेक उद्योगपतींमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय मानक ब्युरोने झवेरी बाजार परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर आणि बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन छोट्या संस्थांवर छापे टाकले होते. या कारवाईची झवेरी बाजारासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार चर्चा सुरु असताना सोमवारी दुपारी 3 वाजता चार जणांनी झवेरी बाजारातील सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयावर घुसले. त्यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारले की, ‘तुम्हाला काय पाहिजे?’ यावर त्यांनी सांगितले की, ‘आम्ही ईडीचे अधिकारी आहोत. आम्ही छापा टाकायला आलो आहोत.’ ईडी हे नाव ऐकताच कर्मचाऱ्यांची एकच भंबेरी उडाली. चोरट्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यांनी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बेड्या घातला. चोरट्यांनी 10 मिनिटांच्या आता या कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 1 कोटी 70 रुपयांचे 3 किलो सोन्याचे दागिने आपल्या ताब्यात घेतले.
या छापेमारीबाबत शंका आल्याने व्यावसायिकाने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. सर्व घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतली असून या फुटेजमध्ये चार जण कर्मचाऱ्या आणि व्यावसयिकाला इमारतीच्या बाहेर जाताना दिसत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.