कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ञ, डॉ.जे.एफ.पाटील यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यांत आले होते. उपचार सुरु असतानां त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी कमल पाटील, मुलगा अभिनंनदन, मुलगी राजलक्ष्मी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अभ्यासू आणि सामाजिक जाणिवेतून आर्थिक प्रश्नांची मांडणी करणारे अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्रासारख्या जटील विषयावर हुकूमत गाजवत हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे डॉ. जे.एफ.पाटील केंद्राचे बजेट असो वा राज्याचे बजेट त्याविषयी सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषेत माहिती देत.
सांगली जिल्यातील समडोळी गावी त्यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेचे आष्टा कॉलेज, विलिंग्डन कॉलेज येथे अध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अभ्यास संस्थेमध्ये संशोधन करून पी.एच.डी मिळवली. डॉ. ज.एफ.पाटील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख होते.
निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांना रा.ना.गोडबोले युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यासनावर प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यांनी आजपर्यंत शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘अर्थशास्त्रीय संशोधनाची तोंडओळख’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ पथदर्शी मानला जातो. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले. डॉ. जे. एफ. पाटील यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ देशाच्या अर्थसंकल्पाचे सोप्या भाषेत विश्लेषण करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचवले.
विविध आर्थिक आणि सामाजिक प्रश्नावर भूमिका मांडत विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या डॉ. जे.एफ.पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी ९ वाजता पंचगंगा सम्शनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.