मुंबई – मुंबईतील जे.जे. रुग्णालय परिसरात नर्सिंग क़ॉलेजचा भाग डी.एम. पेटीट नावाच्या १३० वर्षे जुन्या ऐतिहासिक इमारतीमध्ये एक भुयार सापडले आहे.सापडलेल्या या भुयारामुळे आता अनेकांचीच उत्सुकता आणि कुतूहल शिगेला पोहोचले आहे.काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज परिसरात राज्यपाल राहत असलेल्या राजभवन येथेही असेच भुयार सापडले होते.
बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आला आहे ज्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारे झाकण काढण्याचा प्रयत्न केला.झाकण निघताच तिथे काहीशी पोकळी असल्याचे त्यांना जाणवले.सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने पुढील पाहणी केली आणि तिथे भुयार असल्याचे समोर आले आहे.हे भुयार साधार २०० मीटरचे असून इमारतीचे आयुर्मान पाहता ते १३० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात आले आहे.जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयारबाबत कळवण्यात आलं आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सर जे जे रुग्णालयाची वास्तू आणि या भागामध्ये बऱ्याच ब्रिटीशकालीन इमारती आहेत.त्यातच आता सापडलेले भुयार पाहता आता मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील माहिती सोपवण्यात आली आहे.
दरम्यान,सर जे जे रुग्णालयाच्या इमारती १७७ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. सर जमशेदजी जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती उभारण्यात आल्या आहेत. १६ मार्च १८३८ रोजी जमशेदजी जिजीभॉय यांनी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली होती.त्यानंतर ३० मार्च १८४३ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली.तर १५ मे १८४५ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले झाले होते.