नवी दिल्ली- देशातील नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) च्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेली वादग्रस्त डॉक्युमेंट्रीची पोस्टर शेअर केली आहे. या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंग करीता ‘आमच्या सोबत सहभागी व्हा’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दिशानिर्देश जारी करीत अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरर्पोरेशने (बीबीसी) बनवलेली विवादास्पद डॉक्युमेंट्री दाखवण्यासाठी विद्यापीठात पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सूचना दिल्या आहेत की, ‘विद्यापीठातील शांतता असे कार्यक्रम भंग करू शकतात. विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम घेऊ नयेत. ज्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात शेड्युल बनवले आहे, त्यांनी ते तत्काळ रद्द करावे, अन्यथा कारवाई केली जाईल.’ दरम्यान, अमेरिका स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी या माहितीपटावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटाबाबत माहिती नाही. अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांचे त्यांनी कौतुक केले.