मुंबई – जीएसटीचे किचकट नियम बदलण्यात यावेत, अशा मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय उद्योग व्यापारी मंडळाचा दिला आहे. देशात कृषी उत्पन्न बाजार समितीतील वस्तूचे दर वेगवेगळे आहेत. वस्तू सेवा कर केवळ 5 आणि 10 टक्के वसुली करावी, असे मंडळाने देखील सांगितले.
व्यापार मंडळाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वस्तू व सेवा कर प्रणाली जेव्हा पासून लागू झाली तेव्हापासून 1 हजार 265 वेळा त्यात सुधारणा करण्यात आल्या. अशा वारंवार बदलांनी व्यापारी कोलमडून गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर विभागातील अनेक अधिकाऱ्यांनाच नियम माहिती नाही. ही कर प्रणाली सरळ सुटसुटीत हवी आहे. यासाठी देश पातळीवर अनेक निवेदने देण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. मात्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशव्यापी आंदोलन तयारी सुरू केली असून राज्य राज्यात जाऊन व्यापारी वर्गात जन जागृती करण्यात येत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.