संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

जिल्हा परिषद भरती प्रक्रीया रद्द! २० लाख इच्छुकांची घोर निराशा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी अनेक कारणे दिली असली तरी ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद भरतीचा डेटा गहाळ झाल्याने भरती रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. त्यामुळे ३ वर्षांपासून चातकाप्रमाणे भरतीची वाट पाहत असलेल्या राज्यातील २० लाख इच्छुक उमेदवारांच्या पदरी घोर निराशा पडली.

जिल्हा परिषदेच्या विविध प्रवर्गातील १३ हजार ५१४ जागांच्या भरतीसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर २० लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र संकेतस्थळावरील गोंधळानंतर ते बंद करून नव्याने निर्णय काढून सरकारच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या भरतीचे काम न्यास कंपनीला दिले. त्यानुसार कंपनीने आरोग्य विभागाची भरती सुरू केली. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. राज्यभरातून या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात असल्यामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी आरोग्य खात्यातील भरती रद्द केली. परंतु जिल्हा परिषदेच्या १८ संवर्गातील १३ हजार ५१४ पदांची भरती न्यास कंपनीकडे दिली होती. त्यासाठी ग्रामविकास विभागाने १० मे २०२२ रोजी सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीसाठी आवश्यक असलेली माहिती कंपनीकडून गोळा करावी, असा अजब आदेश देऊन जबाबदारी झटकली. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात निर्णय जाहीर केला. सरकारने ही भरती रद्द करताना आरक्षण आणि भरतीला झालेला विलंब ही कारणे दिली आहेत. मात्र प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाला २० लाख अर्जदारांची माहिती संग्रहित करता आली नाही. त्यामुळे ही भरती रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. १८ प्रवर्गातील भरती रद्द झाल्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी भरलेले परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परत केले जाईल, असे सरकारने म्हटले आहे. मात्र या प्रकारामुळे तरुणांची घोर निराशा झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami