मुंबई – अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर आता अब्जाधीश असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या टॉप १० यादीतून बाहेर गेले आहेत. त्यांची श्रीमंतांच्या यादीत ११ व्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी जगातील टॉप १० अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी यांची कमाई सर्वाधिक राहिली होती. अदानींनी या यादीत गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे आतापर्यंत जानेवारीमध्ये अदानींच्या संपत्तीत ३६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यामुळे गौतम अदानी यांनी आता जगातील पहिल्या १० सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या एलिट क्लबमधील स्थान गमावले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकांत अदानी आता ८४.४ अब्ज डॉलर संपत्तीसह ११ व्या क्रमांकावर आहेत. अदानींच्या संपत्तीत २०२२ मध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. त्यांच्या संपत्तीत झालेली वार्षिक वाढ ही सुमारे ४० अब्ज डॉलरची होती. सध्या अदानी हे बिल गेट्स, जेफ बेझोस आणि गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांसारख्या ९अब्जाधीशांच्या मागे आहे. मुकेश अंबानी या यादीत १२ व्या क्रंमाकांवर आहेत. अदानींविरोधातील हिंडेनबर्ग रिसर्चच्या ३२ हजार शब्दांच्या अहवालानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गेल्या तीन सत्रांत १३.८ लाख कोटींचा फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान बँकिंग स्टॉक्सचे झाले आहे. या घसरणीमुळे अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांच्या कालावधीत अदानी स्टॉक्सचे एकूण बाजार भांडवल ५.१७ लाख कोटींनी कमी झाले आहे.