मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हात जोडून नतमस्तक होतानाचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला आहे.मात्र त्याच्या मागे बल्ब दिसत असून शिवरांयांच्या काळात बल्ब कुठून आले असा सवाल करत नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेतील अक्षय कुमारचा पहिला लूक त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे कॅप्शन देत अक्षयने हा फोटो शेअर केला आहे. मात्र नेटकऱ्यांना अक्षयचा लूक फारसा पसंत असल्याचे दिसत नाही कारण यावरुन मीम्सचा पूर आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात चालणाऱ्या अक्षय कुमारच्या मागे बल्बचे झुंबर दिसत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ते १६८० या काळात साम्राज्य केले. थॉमस एडिसनने १८८० मध्ये बल्बचा शोध लावला, मग हे कसे काय?, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित करुन अक्षयला ट्रोल केले आहे. दिवाळी २०२३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर करत म्हटले की ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येत आहे – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढले जात आहे असे वाटते,अशी टिका आव्हाडांनी केली आहे.