बिजापूर- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूरमध्ये आज सकाळी ७.३० च्या सुमारास पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यात एका महिलेसह ३ माओवादी ठार झाले. पोमरा गावातील जंगलात ही चकमक झाली.
नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यातील पोमरा गावाजवळच्या जंगलात जवळपास ४० माओवादी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या भागात शोध मोहीम हाती घेतली होती. तेव्हा सकाळी ७.३० च्या सुमारास नक्षलवादी आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. त्यात एका महिलेसह ३ माओवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. या माओवाद्यांची ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.