बीजिंग – अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन बनवणाऱ्या चीनला मोठा हादरा बसला. गेल्या आठवड्यात चिनी अंतराळ संस्थेने अवकाशात पाठवलेले २३ टन वजनाचे महाकाय रॉकेट प्रक्षेपणानंतर निकामी होऊन भरकटले. आता ते पृथ्वीच्या दिशेने झपाट्याने परत येत आहे. भरकटलेल्या रॉकेटचे अवशेष युरोपमध्ये पडू शकतात, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र ते कुठे पडतील याचा त्यांना अंदाज नाही. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून स्पेनमधील काही विमानतळे बंद केली आहेत. चीनचा अवकाशातील ढिगारा जगासाठी मोठा धोका बनला आहे.
अंतराळात स्पेस स्टेशन निर्माण करत असलेल्या चीनने सोमवारी दुपारी हैनान येथील वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून मेंग्शन रॉकेट अवकाशात प्रक्षेपित केले. अंतराळ स्टेशनमध्ये १३ तासांनी ते पोहोचेल, असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला होता. मेंग्शन रॉकेटचे वजन २३ टन असून उंची ५८ फूट आहे. तर जाडी १३.८ फूट आहे. हे महाकाय रॉकेट प्रक्षेपणानंतर निकामी झाले. भरकटलेले हे रॉकेट आता पृथ्वीच्या दिशेने परत येत आहे. ते पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट होईल. परंतु त्याचे काही अवशेष युरोपमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून स्पेनने काही विमानतळांवरील विमान उड्डाणे बंद केली आहेत. चीनचा अवकाशातील ढिगारा संपूर्ण जगासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. जगातील सुमारे ८८ टक्के लोकांना त्याचा धोका आहे. काही दिवसांपूर्वीच चीनचे रॉकेट अनियंत्रित होऊन पृथ्वीच्या वातावरणात घुसले होते. त्यानंतर चीनने पाठवलेले हे दुसरे रॉकटही अवघ्या ६ दिवसांनी भरकटले आणि पृथ्वीच्या दिशेने परत फिरले. त्याचा काही भाग हिंदी महासागरात पडणार आहे. ही दिलासादायक बाब असली तरी त्याचे काही अवशेष युरोपियन भागात कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या जुलैमध्ये चीनचे रॉकेट लॉन्च झाल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर कोसळले. तेव्हा त्याचे काही अवशेष मलेशिया आणि आजूबाजूच्या देशांत पडले होते.