अहमदनगर:- अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत घेणाऱ्या तीन रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू होत. उपोषणास्थळी विरोधीपक्षनेते अजित पवार आमदार निलेश लंकेंची भेट घेतली. त्यांनी मध्यस्थी करत लंके यांची समजूत काढली. यानंतर अखेर चार दिवसांनंतर निलेश लंकेंनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला. अजित पवार आणि आमदार निलेश लंके यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर लंके यांनी उपोषण मागे घेतले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लंके यांची तब्येत खालावली होती. त्यांचे दोन किलो वजन घटले आहे. अहमदनगर ते पाथर्डी-शेवगाव, अहमदनगर ते कोपरगाव, अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केली. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान झाले नाही. त्यामुळे लंके गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते.