चंद्रपूर- येथील दक्षिण ब्रम्हपुरीच्या आवळगाव परिसरातील कक्ष क्रमांक 1047 मध्ये ‘के-4’ या नर वाघाने धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या वाघाने नागरिकांवर हल्ला सुद्धा केला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागाचे पथक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शॉर्पशुटर अजय मराठे यांनी वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन दिले. त्यानंतर वाघ बेशुद्ध झाल्यानंतर सायंकाळी वाघाला सुरक्षितरित्या पिजर्यात जेरबंद करण्यात आले आहे.
जेरबंद करण्यात आलेला के-4 हा नर वाघ दोन ते अडीच वर्षांचा असून त्याला चंद्रपूर येथील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक के.आर. धोंडणे, वनक्षेत्रपाल आर.डी. शेंडे, यांच्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पथकाच्या कर्मचार्यांनी केली आहे. ब्रम्हपुरी वनविभागातील दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव शेतशिवारात ‘के-4’ या नर वाघाने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केले होते. ब्रम्हपुरी वनविभागाच्या पथकाने अखेर त्याला जाळ्यात अडकवून बेशुद्धीचे इंजेक्शन देत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.