पिंपरी-चिंचवड : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीची पुन्हा धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सोशल मिडिया अध्यक्ष विकास लेले यांनी ही धमकी दिली आहे.विकास लेले यांच्याविरोधात पिंपरीच्या सांगवी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आज पुन्हा शाईफेकीची मुक्त उधळण होणार’,अशा आशयाची पोस्ट लेले यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे 10 डिसेंबर रोजी सायंकाळी चिंचवड गाव येथे देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते.त्यावेळी एका कार्यकर्त्याच्या घरी जावून परतत असताना मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.याप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघेजण समता सैनिक दलाचे आणि एकजण वंचित चा कार्यकर्ता असल्याचे समोर आले.त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीचे सोशल मिडिया अध्यक्ष विकास लेले यांनी पाटील यांना शाईफेकीची धमकी दिली असून त्यांच्यावर पिंपरीच्या सांगवी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.