मुंबई- अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी सिमेंटचे ब्लॉक बसवले आहेत. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती गोवंडी-मानखुर्दचे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. अभिनेत्री पूजा भट्ट हिनेही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करून उपाययोजना करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे सोशल मीडियावर केली होती.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर अलीकडेच बांधलेल्या उड्डाण पुलावर अवजड वाहनांना प्रवेश नाही. रात्रीच्या वेळी अशा वाहनांनी पुलावर प्रवेश करू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना सिमेंटचे ब्लॉक बसवले आहेत. पुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी बॅरिगेज बसवले आहेत. सिमेंटच्या या ब्लॉकमुळे तेथे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी येथे अपघाताची शक्यता आहे. त्याविषयी परिसरातील नागरिक भीती व्यक्त करत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी मुंबई पालिकेकडे केली आहे. अभिनेत्री पूजा भट्ट हिनेही सोशल मीडियावर पोस्ट करून या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधले आहे. पुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी अडथळे असल्यामुळे पुलावर वाहनांना वेग वाढवण्यास वाव नाही. तरीही काही अडचण आल्यास आम्ही त्याकडे लक्ष देऊन त्याचे निराकरण करू, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.