मुंबई – एक छोटा दवाखाना म्हणून सुरु करण्यात आलेले घाटकोपर येथील सेठ व्ही. सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका राजावाडी रुग्णालय सध्या अपुऱ्या सुविधांमुळे चर्चेत आले आहे.या रुग्णालयात आयसीयूमध्ये बेडची कमतरता असून एमआयआय आणि सिटीस्कॅन सुविधा बंद स्थितीत असल्याने रुग्णांचे फार हाल होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिव आरोग्य सेनेने ही बाब उजेडात आणली आहे.तसेच या गैरसोयी दूर करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.
पूर्व उपनगरातील मुंबईकरांना रुग्णसेवा पुरविणारे हे एक मध्यम दर्जाचे हे रुग्णालय आहे.मुलुंड,भांडूप,चेंबूर ,कुर्ला परिसरातील बहुतांशी रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्ण संख्येच्या तुलनेत याठिकाणी अनेक समस्या दिसून येतात.या रुग्णालयात डॉक्टरची कमतरता,न्यूरो सर्जन नाही, अपंगांसाठी स्वतंत्र ओपीडी नाही, परिसरात अस्वच्छता आणि सिटीस्कॅन व एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यामध्ये गर्भवती महिलांची अवस्था बिकट दिसून येते. त्यामुळे शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभा राऊळ,कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी शिष्टमंडळासह रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.भारती राजूलवाला व वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पैयनवार यांची भेट घेऊन या असुविधा दूर करण्याची मागणी केली.