ब्रासिलिया – मोबाइल हँडसेट बनवणार्या कंपन्यांनी बाजारात आता मोबाईल फोनसोबत चार्जर न देण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे.सर्वप्रथम, ‘अॅपल’ने स्मार्टफोनसह चार्जर न देण्यास सुरुवात केली आणि नंतर लगेचच सॅमसंगसह इतर कंपन्यांनी देखील त्यांच्या काही मॉडेलसह चार्जर देणे बंद केले. आयफोनसोबत चार्जर न देण्याचा अॅपलचा निर्णय कंपनीवरच भारी पडला आहे. ब्राझीलमध्ये कंपनीला चार्जरशिवाय आयफोन विकल्याबद्दल 20 मिलियन म्हणजेच सुमारे 164 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयफोनसोबत चार्जर न देणे हे चुकीचे आहे. असे करणे म्हणजे ग्राहकांना कंपनीचा आणखी एक प्रोडक्ट विकत घ्यायला लावण्यासारखे असल्याचे ब्राझीलमधील एका न्यायाधीशांनी म्हटले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ब्राझीलच्या न्याय मंत्रालयाने याच प्रकरणात ‘अॅपल’ला 2.5 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता आणि कंपनीला चार्जरशिवाय आयफोन 12 आणि आयफोन 13 मॉडेल विकण्यास मनाई केली होती.