पणजी – परप्रांतीय कामगारांची माहिती उपलब्ध व्हावी याकरीता गोवा सरकार लवकरच एक योजना सुरु करणार आहे. ज्याचे नाव ‘कामगार कार्ड योजना’ असे असणार आहे. याद्वारे राज्यात कामाला येणाऱ्या कामगारांना हे कार्ड दिले जाईल. ज्यामुळे त्यांच्याविषयी सर्व तपशीलवार माहिती ठेवण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. “कार्डच्या मदतीने कामगारांची माहिती उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या कल्याणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकतील” अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील गुन्हेगारी वाढत असून २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये खून, बलात्कार व रस्ता अपघातात वाढ झाली. या घटनांमध्ये गोव्याव्यतिरिक्त परप्रांतीयांनी केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जास्त आहे. गुन्ह्यांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी विविध भागात राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांची कसून तपासणी सुरु केली.