म्हापसा -उत्तर गोवा जिल्ह्यातील बारदेस तालुक्यातील हळदोणा गाव हे उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांधल्या गेलेल्या तीन प्रसिध्द पुलांसाठी ओळखले जाते. पण, गेली अनेक वर्षे यातील दोन पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. खोर्जुवे-हळदोणा केबल स्टेड ब्रिज,खोर्जुवे-पैरा ओपनींग ब्रिज व कालवी-कारोना या उत्कृष्ट तीन पुलांपैकी खोर्जुवे-हळदोणा केबल स्टेड ब्रिज,खोर्जुवे-पैरा ओपनींग ब्रिज या दोन पुलांची बिकट अवस्था झाली आहे.
या सर्वात प्रसिद्ध पुलांपैकी एक असलेले खोर्जुवे पूल आहे.राज्य सरकारने २००४ मध्ये हे केबल स्टेड पूल उभारले होते.या पुलामुळे खोर्जुवे बेटाला जोडण्यासह डिचोली तालुक्यातील लोकांना अंतर कमी करण्यास दिलासा मिळाला आहे.पण, या पुलाच्या देखभालीकडे मात्र सरकारने डोळेझाक केली आहे.या पुलाचे खांब गंजले आहेत.
२००५ मध्ये खोर्जुवे पैरा हा पूल उभारण्यात आला. खोर्जुवे बेटाला डिचोली तालुक्याशी तो जोडतो. खुला होणारा जमीन समांतर असा हा पूल आहे. खाणवाहू बार्जना नदीतून ये-जा करण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून हा हॉरिझोन्टल पूल बांधण्यात आला. देशातील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने उभारलेले हे पहिलेच पूल आहे. पण, पुलाच्या उद्नघाटनानंतर कधीच हा पूल उघडला गेलेला नाही. या पुलाच्या अनेक वस्तूही गहाळ झालेल्या आहेत.या दोन्ही पुलावर विद्युत रोषणाई आणि रंगकाम केलेले नाही.पर्यटनासाठी हे दोन्ही पुल आकर्षण असताना त्याच्या देखभालीकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.स्थानिक आमदार अॅड.फेरेरा यांनी त्यासाठी विधानसभेत आवाज उठविला जाईल असे म्हटले आहे.