पणजी – गोव्याची राजधानी पणजी शहर कमालीचे तापू लागले आहे.राजधानी पणजीत काल सोमवारी ३७.९ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ३९ वर्षांतील केवळ फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तिसर्या क्रमांकाचे तापमान ठरले आहे.
याआधी १९८४ साली ३८ अंश तर २००९ साली ३९.२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची पणजीत नोंद झाली होती.डिसेंबर आणि जानेवारी असे सलग दोन महिने गोमंतकीय जनतेने थंडीचा अनुभव घेतला. जानेवारीत तर अक्षरश: अंगात कापरे भरणारी थंडी पडली होती.परंतु १ फेब्रुवारीपासून राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पणजीत ३७.९ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान गेल्या ३९ वर्षांतील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे तर सर्व महिन्यांचा विचार केल्यास हे तापमान सर्वाधिक दहाव्या क्रमांकाचे ठरले आहे.१६ आणि १७ फेब्रुवारी रोजी सुद्धा वाढते तापमान जाणवणार आहे. सोमवारी पणजीत कमाल तापमान ३७.९, तर किमान तापमान २१.८ आणि मुरगावात कमाल तापमान ३४.२ आणि किमान तापमान २२.४ अंश डिग्री सेल्सिअस राहिले, अशी माहिती राज्य हवामान खात्याने दिलेली आहे.दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिने गोमंतकीय जनतेने गुलाबी थंडीचा आस्वाद घेतलेला आहे.