संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

गोवा काँग्रेसमध्ये फूट; मायकल लोबो यांना गटनेतेपदावरून हटवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी – महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीची जखम ओली असतानाच आता गोव्याच्या राजकारणातही भूकंप झाला आहे. गोवा काँग्रेसमधील ११ पैकी ८ आमदार वेगळा गट करण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. त्यातच आता काँग्रेसने कारवाई करत मायकल लोबो यांना गटनेतेपदावरून आणि विरोधी पक्षनेतेपदावरून हटवले आहे. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोघांनी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केला असून या दोन्ही नेत्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘काँग्रेस फोडण्यासाठी किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही’, असा घणाघाती आरोपही दिनेश गुंडू राव यांनी यावेळी भाजपावर केला.

गोव्यात काँग्रेस आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता नवा नेता निवडला जाईल, असे राव यांनी सांगितले. दरम्यान, आता गोवा काँग्रेसमधील फूट अटळ असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र गोव्यात काँग्रेसचे केवळ ११ आमदार आहेत. यापैकी जर ९ भाजपामध्ये गेले तर काँग्रेसकडे केवळ दोनच आमदार उरतील.

यापूर्वी १० जुलै २०१९ला कॉंग्रेसचे १० आमदार भाजपात सामील झाले होते. आता बरोबर तीन वर्षांनी याच घटनेची पुनरावृत्ती होणार, असे दिसते आहे. दरम्यान, गोव्यातील काँग्रेसचे एक-एक आमदार आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपर्कात येत आहेत. मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई यांनी प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिल्याचे कळते आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami