मुंबई - आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांच्या दलनात आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात गोवरमुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, राज्य सरकार यावरती कोणत्याही उपाय योजना करताना दिसत नाही. आम्ही कोविडच्या काळात जसे हाताळले होते, तसे या सरकारकडून होताना दिसत नाही.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उदय सामंत यांना उद्योगमंत्री म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेले नाही. राज्य सरकारने त्यांना या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर ठेवलेले आहे. ज्यांचा या खात्याशी संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. महाराष्ट्र द्व्ोष सुरु आहे. एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्याच प्रसंगाची तुलना ही शिवाजी महाराजांसोबत केली जातेय. यातून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामधूनच अशा पद्धतीची वक्तव्य येतात मला असे वाटते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.