स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिककरांचा विरोध
नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिककरांचा तीव्र विरोध दर्शवला जात आहे. स्मार्ट सिटीकडून गोदा घाटावर सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. गोदा घाटावर सुरू असलेल्या कामांमुळे येथील छोट्या छोट्या मंदिरांना तडे जात आहेत. देवांच्या मूर्ती भग्न होतायत. त्यामुळे पुरातत्व विभागाची परवानगी न घेता सुरु असलेली काम थांबवा. आधी डागडुजी करा अशी नाशिकवासीयांकडून मागणी होत आहे. मात्र काम थांबवले नाही तर सत्याग्रह करून असा इशारा आता नाशिकवासीयांकडून देण्यात आला आहे.
नाशिककरांची गोदा प्रेमींची मागणी होती की शेकडो वर्षापूर्वीच्या मंदिराची दुरुस्ती करून नंतर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात यावे. मात्र गेल्या काही महिन्यापासून गोदाघाटावर सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सुशोभीकरण काय तर फरश्या टाकल्या जात आहेत. मात्र यासाठी जुना स्ट्रक्चर तोडून नवीन स्ट्रक्चर इथे उभे केले जात आहे. जिथे आधी भक्कम पायऱ्या होत्या त्या तोडण्यात आल्या आहेत. मात्र या पायऱ्या तोडतअसतानां जी आजूबाजूची मंदिरे आहेत त्यांना तडे जायला सुरुवात झाली आहे. इथली छोटी-छोटी मंदिरे होती त्यांना तडे गेले आहेत. हादरे बसले आहेत. त्यामुळे सद्यस्थिती गोदाकाठावर जे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे त्याला नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे. मंदिरातील मूर्तीना देखील हानी पोहचत असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.
जानी पुढे म्हणाले कि, स्मार्ट सिटीने मंदिरे बांधून द्यावी, पायऱ्या बांधून द्याव्यात, स्मार्ट सिटीच्या समितीवर मनपा, पोलीस प्रशासन असून त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्वांनी हस्तक्षेप करून लवकरात लवकर ते काम आता थांबवलं पाहिजे. जर काम थांबले नाही तर आम्ही येत्या शुक्रवारी मोठा सत्याग्रह उभारणार आहोत, या आंदोलनाद्वारे प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन स्मार्ट सिटीच काम एक्सपोज करणार असल्याचे ते म्हणाले. एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाशिककरांच्या भावना तीव्र होत आहेत, त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने मंदिरांना तडे जात असल्याच्या बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.