नाशिक : गोदावरीपाठोपाठ आता अहिल्या नदीपात्रात पुलासाठी बांधकाम करण्यात येत आहे.नदीपात्रालगतची बांधकाम सुरू असलेली जागा आखाड्याची असून, ती धरणासाठी दिली होती. त्यावर परस्पर बांधकाम होत असल्याचा आरोप श्री पंचायती आखाडा नया उदासीन आखाड्याने केला आहे. पालिकेने मात्र नदीपात्रात बांधकाम नव्हे, तर पूल उभारला जात असल्याचा दावा केला आहे.या अतिक्रमणाबाबत चौकशी सुरु आहे.
गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरीपात्रावर काँक्रिट टाकून रस्ता उभारला आहे. त्याविषयी बऱ्याच तक्रारी राष्ट्रीय हरित लवादाकडे करण्यात आल्या. विशेष म्हणजे नदीपात्रात बांधकामास हरित लवादाच्या आदेशान्वये बंदी असतानाही हे बांधकाम होत असल्याची तक्रार आहे.त्यामुळे हरित लवादाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी ललिता शिंदे यांनी केली आहे.या प्रकरणी स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि पंचायती आखाडा नया उदासीन यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तातडीने सायंकाळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांची बैठक घेत चौकशी सुरू केली आहे.महंत गोपालदास यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला याविषयी अर्ज देत आक्षेप नोंदविला आहे. त्यात ज्या जागेवर विकासकामे सुरू आहेत, त्यावर हरकत आहे. संबंधित जागा आखाड्याची असून, ती धरणासाठी दिलेली असताना त्यावर पूल उभारून बांधकामासाठी परवानगी देण्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने परवानगी मिळविली असल्याचा आरोप केला आहे.