लंडन – ब्रिटनमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून कहर झाला आहे. पारा उणे १० अंशांपर्यंत खाली घसरल्याने स्टॅन्स्टेड विमानतळातळाच्या विमान धावपट्टीवर काल रात्री प्रचंड बर्फ पडला. त्यामुळे स्टॅन्स्टेड विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. हिथ्रो येथे 50 हून अधिक उड्डाणे बंद करण्यात आली कारण गोठवणारी थंडी आणि धुक्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रणाला निर्बंध लादण्यास भाग पाडले गेले,तर गॅटविक येथीलही 30 हून अधिक उड्डाणे हिमवृष्टीमुळे विलंबाने किंवा वळवण्यात आली.
लंडन आणि इंग्लंडच्या आग्नेय भागात रविवारी संध्याकाळी जणू बर्फाचा पूर आला. एसेक्सच्या काही भागांमध्ये सुमारे 6 इंचांपर्यंत बर्फाचा थर साठल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी सांगितले की ते प्रतिकूल हवामानाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. पोलिसांनी जनतेला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. वॉरविकशायर पोलिसांनी काही वाहनचालकांना त्यांना कार रस्त्यात सोडून घरी जाण्यास सांगितले. विशेषतः स्ट्रॅटफोर्ड परिसरात प्रवास टाळण्याचा सल्ला देखील चालकांना दिला.गॅटविक एक्स्प्रेस, थेम्सलिंक, दक्षिण आणि दक्षिण पश्चिम रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ब्रिटनच्या बर्याच भागात धुके आणि बर्फाचे सहा पिवळे इशारे दिले आहेत. ग्लॉस्टरशायरमध्ये सुमारे 40 शाळा बर्फ वृष्टी मुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर वेल्श रुग्णवाहिका सेवेने सांगितले की त्यांना शनिवारी 2,000 हून अधिक आपत्कालीन कॉल आले होते.