मुंबई – मुंबई नगरीत येणाऱ्या पर्यटकांना गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन परिसरात कुठूनही व्हावे या उद्देशाने मुंबई महानगरपालिका लवकरच याठिकाणचे अडथळे दूर करणार आहे. त्यामुळे गेट ऑफ इंडिया समोरील रस्त्यावरूनही संपूर्ण वास्तूला पाहणे सहजशक्य होणार आहे. येत्या काळात नव्या बदलांसह हा परिसर पर्यटकांना पहायला मिळणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी मुंबई महापालिका १४ कोटी रूपये खर्च करणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
या सुशोभिकरणाच्या कामामुळे या परिसरातील तिकिट काऊंटर, टॉयलेट ब्लॉक, सुरक्षा चौकी हटवण्यात येणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया वास्तू या परिसरात दिसण्यासाठीचे हे काही अडथळे आहेत. या गोष्टी हटवून त्याठिकाणी सरसकट कुठूनही वास्तू दिसेल अशा स्वरूपाची रचना याठिकाणी केली जाईल.वास्तूच्या परिसरात अनेक दिशांमधून या वास्तूला पर्यटकांना पाहता यावे हाच उद्देश या कामाच्या निमित्ताने ठेवण्यात आला आहे. या कामासाठी हेरीटेज समितीमार्फतचे ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेने मिळवले आहे.त्यामुळे निविदा प्रक्रियेचा भाग असलेल्या कामांना आता सुरूवात होणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया या वास्तूच्या परिसरात अनेक ठिकाणी वीजेचे खांब आहेत.प्रकाश योजनेसाठी हे पथदिवे लावण्यात आले आहेत.परंतु या पथदिव्यांची संख्या कमी करत आता किमान वीजेचे खांब या परिसरात ठेवण्यात येतील. या नव्या खांबांवरुन सीसीटीव्ही आणि प्रकाश योजना अशा दोन्ही पद्धतीची सुविधा देण्यात येईल.त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा परिसरातील पुतळा हादेखील सर्व बाजूने पाहता येईल,अशा स्वरूपाचे काम येत्या काळात करण्यात येणार आहे.