अहमदाबाद: गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले होते. मोदींनी रविवारी त्यांच्या आईची भेट घेतली. आईच्या भेटीला जाताना त्यांनी एक शाल घेतली होती. या शालची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा आहे.या केशरी रंगाच्या शालची किंमत १६५० डॉलर म्हणजे तब्बल १ लाख ३४ हजार रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे. यावरून सोशल मीडियावर मोदींना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
हम तो फकीर आदमी है असे म्हणणारे मोदी आईला भेटायला जातात तेव्हा १ लाख ३४ हजार रुपये किंमतीची पश्मीना शाल परिधान करतात. अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. तर काहींनी म्हटले की, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे, जंगलामध्ये भटकंती करणारे, आपले साधे जीवन जगणारे पंतप्रधान १ लाखांची शाल कशी वापरू शकतात.काही वर्षांपूर्वी त्यांच्या सूटवरुन टीका झाली होती. या सूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे नावही विणण्यात आले होते.