रत्नागिरी – जिल्ह्यातील खेड खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे कुणा अज्ञाताने उघडले आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे या धरणावर सुरक्षारक्षकच नेमलेला नाही.त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, या धरणाचे दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते आणि धरणाचे दरवाजे अर्धवट उघडले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे दरवाजे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.