*उद्योगमंत्री सामंत सहकुटुंब तिरुपतीकडे विमानाने रवाना
कोल्हापूर – कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच एका विमानाने रात्रीचे उड्डाण घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची कोल्हापूर विमानतळाला प्रतीक्षा होती. ती अखेर पूर्ण झाली असून लवकरच नाईट लँडिंग सुविधेच्या माध्यमातून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या परिवाराने कोल्हापूरातून तिरुपतीकडे खाजगी विमानाने प्रवास केला.रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी विमानाने उड्डाण केले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने रात्रीच्या विमान सेवेचा वापर सुरू झाला आहे.
विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले की,डिजीसीएच्या परवानगीनंतर आणि एपीआय प्रणालीवर विमानतळाबाबतची माहिती प्रसिद्ध झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने ३ नोव्हेंबर पासून विस्तारित धावपट्टीचा तसेच नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरू केला.मात्र या विमानतळावरून कोणत्याही विमान कंपनीने किंवा खासगी वापरकर्त्यांनी याबाबत नाईट लँडिंग आणि टेक ऑफसाठी मागणी केली नव्हती.मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत विमानतळ प्रशासनाला तिरुपतीकडे आपण जाणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास खाजगी विमानाने तिरूपतीकडे उड्डाण घेतले. नाइट लँडिंग सुविधेचा रविवारी प्रत्यक्षात वापर झाला.या सुविधेचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने एअर फिल्डवरील लाईटिंग,वीजेचा पुरवठा, धावपट्टी, सुरक्षितता,आदींची तपासणी केली.विमानाचे सुरक्षितपणे आणि वेळेत उड्डाण झाले.त्यामुळे आता रात्रीची सुरक्षित सेवा देण्यास हे विमानतळ सज्ज झाले आहे.