कोल्हापूर – कोरोना काळात मार्च २०२०पासून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. त्यापैकी कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ही गाडी पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.
नवीन वेळापत्रकात या गाडीचा समावेश केला आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री, कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-मुणगुरू आणि कोल्हापूर-बिदर या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.कोल्हापूर-मुणगुरू ही हैदराबाद मार्गे जाणारी दैनंदिन गाडी आता बेळगाव-मुणगुरू अशी सुरू आहे.तसेच कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी,अशी सातत्याने मागणी होत आहे. मात्र, अपेक्षित प्रवाशांचे कारण रेल्वेकडून सांगण्यात येत होते. कोल्हापूर-मुंबई मार्गावर रात्री धावणार्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी असते.दररोज दीडशे पेक्षा जास्त प्रवाशांची प्रतीक्षा यादी असते.त्यामुळे मुंबईला जाणार्यांसाठी सह्याद्री एक्स्प्रेसची मागणी कायम आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.जुलै महिन्यात रेल्वेचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध होते.या वर्षीच्या नव्या वेळापत्रकात कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसचा मध्य रेल्वेने समावेश केला आहे. ही गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.