कोल्हापूर – मिरज शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या कोल्हापूर महामार्गावर पाटील पेट्रोल पंपाजवळ इनोव्हा आणि दुचाकी समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये झाली असून अधिक तपास सुरु आहे.
सिद्धार्थ आणि सदाशिव हे दोघेजण शिरोळ येथील संकपाळ वीटभट्टीत कामगार होते. धामणी येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरुन गेले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास धामणीकडून मिरजेच्या दिशेने दोघे जात असताना मिरजेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा त्यांच्या गाडीला धडकली. हा अपघात एवढा मोठा होता की, दोघांच्याही मेंदूला जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचा चक्काचूर झाला. इनोव्हा गाडीचेही मोठे नुकसान झाले असून गाडीतील प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.