कोल्हापूर – 13 जानेवारीपासून कोल्हापूर-बंगळूर मार्गावर इंडिगो कंपनीचीविमानसेवा सुरु होणार असून आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. बंगळूर आयटी तर फाउंड्री आणि उद्योगांसाठी कोईमतूर प्रसिद्ध असल्याने कोल्हापुरातील उद्योजक नोकरदार विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली. कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरु झाल्याने विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार पडला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 22 नोव्हेंबर रोजी 146 आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूरविमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले. स्टार उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या उद्योगक्षेत्रातील कामानिमित्त हे मोठे विमान कोल्हापुरात आले होते. एमब्ररर ई195-ई2 प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान 146 आसनी आहे.